शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय एच.डी.गावकर साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एच. डी. गावकर सेवा संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम!

गोरगरीब लोकांना, विशेषतः कामगार वर्गातील आणि कोकण प्रांतातील जनसामान्यांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत याकरीता शैक्षणिक संस्था उभारणारे शिक्षणमहर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांचे कार्य कर्तव्यनिष्ठेने पुढे नेत ते नावारुपाला आणणारे त्यांचे परमशिष्य शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय हरि धर्माजी उर्फ एच.डी.गावकर यांची आज २४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करीत असताना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही त्यांच्या चाहत्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देत आहोत. 

स्व. गावकर यांची जन्मशताब्दी २०२१ मध्ये संपन्न झाली. ती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी त्यांचे विद्यार्थी, चाहते यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रमांची आखणी केली होती. मात्र कोविदच्या महामारीमुळे ते साध्य होऊ शकले नाही. असे असले तरी आम्ही सदर उपक्रम येत्या वर्षांत, त्यांच्या स्मृतीच्या रौप्य महोत्सवी वर्षांत हाती घेण्याचे योजिले आहे. त्यानुसार येत्या मे महिन्याच्या अखेरीस कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे आम्ही स्थानिक होतकरू उद्योजकांसाठी पर्यटन विषयक कार्यशाळा आयोजित करीत आहोत. कोकणातील पर्यटन विषयाचे एक अभ्यासक आणि स्व. एच. डी. गावकर यांचे विद्यार्थी श्री. विजय चव्हाण (माजी महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, डेक्कन ओडिसी) यांनी या कार्यशाळेची आखणी केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या, पर्यटन संचालनालयाने सहभागी व्हावे याकरीता आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

हे उपक्रम यशस्वी करता यावेत यासाठी आम्ही एच. डी. गावकर सेवा संस्था (रजि. नं. एफ १३३२३९) स्थापन केली असून ती धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र शासन यांच्याकडे नोंदणीकृत केली आहे. स्व. गावकर यांचे चाहते तसेच विद्यार्थ्यांनी आमच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आहे. 

मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एच.डी.गांवकर यांना, त्यांच्या ज्ञानसाधनेची दखल घेऊन, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने आपल्या विविध समित्यांवर तज्ज्ञम्हणून काम करण्याची संधी दिली होती. महाराष्ट्र सरकारने प्रादेशिक विकासाचा असमतोल शोधून शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ. वि. म. दांडेकर समितीला कोकणातील तत्कालीन स्थितीबद्दल माहिती पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारीही एच.डीं.नी पार पाडली होती. विविध शासकीय समित्या, चर्चासत्रे यात सहभागी होताना त्यांनी देशाच्या शिक्षण पध्दतीवर भाष्य केले होते. त्याची दखल शासकीय पातळीवर वेळोवेळी घेतली गेली. इंग्रजांनी आपल्या गरजेसाठी निर्माण केलेली आजची शिक्षण पध्दती विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे रहाण्याचे शिक्षण देत नसून स्वतंत्र भारतात कालबाह्य झालेली ही शिक्षण पध्दती बदलली गेली पहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

"कौशल्य विकास" हा शब्द आज आपल्या देशात परवलीचा झाला आहे. आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधांनांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने "कौशल्य विकासा"साठीच्या योजनांचा आता सपाटा लावला आहे. हे सारं आपल्या देशात आताच घडत असलं तरी सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी कोकणातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठा असाच एक "कौशल्य विकासा"चा प्रयोग त्यांनी वायरी (मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे केला होता. असा हा द्रष्टा पुरूष याच कोकणभूमीत होऊन गेला याची माहिती आज जुन्याजाणत्या मंडळींना आहे. त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा आम्हा त्यांच्या चाहत्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.


-कुमार कदम 
अध्यक्ष- एच. डी. गावकर सेवा संस्था. 
मुख्य संपादक- महाराष्ट्र वृत्त सेवा. 
माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ. 

Comments